त्रस्त नागरिकांमध्ये मंथन : कायद्याचा मान ठेवूनच पाऊल उचलणारश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराअशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची दगडाने ठेचून हत्या झाल्यानंतर त्याच समाजातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आरोपींच्या न्यायालयीन लढाईच्या खर्चाची लोकवर्गणीतून गोळाबेरीज करण्याचे ठरविले जात आहे. यावरून ‘खांडेराव’ याच्याप्रति किती रोष होता, हे दिसून येते.बडनेरा पोलिसांनी सदर हत्येप्रकरणी हिरामन रोकडे व संतोष पकीड्डे या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर या दोन्ही आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. अशोकच्या हत्येच्या दिवशी पोलिसांनी सर्वंकष बाबींचा तपास केला. आरोपींच्या अटकेसह न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाजात कोणताही रोष नाही. मात्र कुख्यात गुंड अशोक याच्या जाचाला कंटाळून सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्यांनी आरोपींना न्यायालयीन लढाईसाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून देण्याबाबत मंथन सुरू केले आहे. लोकवर्गणी करताना संबंधिताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन तशी रक्कम गोळा केली जाणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीवबडनेरा : जो काही पैसा गोळा होईल तो न्यायालयीन लढाईवर खर्च केला जाईल. याबाबत समाजात प्रचार, प्रसार सुरू झाला आहे. अशोकच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपीची आर्थिक स्थिती अतिशय बेताची आहे. भविष्यात याप्रकरणी न्यायालय जो काही निर्णय देईल तो समाजमनाला मान्य राहील. मात्र अशोकचा खात्मा करण्यास ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या जामिनासाठी तसेच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी लागणारा खर्च कसा उभारावा यासाठी युवकांमध्ये मंथन सुरू झाले आहे. आरोपींच्या न्यायालयीन लढाईत सहभागी होताना त्यांच्या कुटुंबियाची होणारी हेळसांड थांबविण्याबाबतही सहकार्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशोक गजभिये याची बडनेरा पोलीस दप्तरी कुख्यात गुंड म्हणून नोंद होती. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकूश बसविण्यासाठी पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले. एवढेच नव्हे तर तडीपारही करण्यात आले. दर दोन वर्षे अशोक न्यायालयीन कोठडीत होता. पोलीस त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मात्र अल्पवयीन मुलीच्या छेडखानीप्रकरणी कारागृहातून जामिनावर सुटून येताच त्याने महिलांना शिवीगाळ केल्यामुळे त्याचा खात्मा करण्यात आल्याचा सूर आता नागरिकांतून निघत आहे. अशोक गजभियेच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपींना कायद्याचा मान ठेवूनच जामिनासाठी समाजमन पुढे येत आहे. कायदेशीर लढाईत सहभागी होताना न्यायालयाचा अवमान होणार नाही, याचे भान ठेवण्याबाबत युवक प्रयत्नशील आहेत. आरोपींच्या जामीनसाठी लोकवर्गणीचा प्रयत्न हा बडनेरा शहरात पहिल्यांदाच अनुभवता येत आहे.
आरोपींच्या न्यायालयीन लढाईसाठी लोकवर्गणीची तयारी
By admin | Published: April 24, 2017 12:42 AM