गेल्यावर्षी सोयाबीन बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सोयाबीन पिकाला शेंगा आल्या नसल्याने परत शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला गेला. कपाशीनेदेखील शेतकऱ्यांना दगा दिला. गहू, हरभरा व मूग, भुईमुगाने आधार दिला. कोरोनाच्या आगमनामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्याकडे असणारा माल विकता आला नाही. मिळेल त्या भावात विक्री करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. परंतु, येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपली शेती कसून तयार केली आहे. आता पावसाची वाट शेतकरी पाहू लागला आहे.
तालुक्यातील शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर धाव घेऊ लागला. परंतु कृषिकेंद्रचालक यांनी उधारीवर बियाणे देत नसल्याने शेतकऱ्यांनी घरधणीचे दाग-दागिने खासगी सावकाराकडे गहाण ठेवून बी-बियाणे खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे ग्रामीण भागात खासगी सावकार मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, त्या खासगी सावकारांनी अधिक प्रमाणात व्याजदर वाढविल्याचे दिसून आले. काही शेतकरी उसणवारीवर नातेवाइकांकडून पैसे घेऊन शेती करीत असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. येणाऱ्या पावसाळी हंगामात छातीला माती लावून धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकरी आपली शेती कसून पेरणीची तयारी करत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.