अमरावती : कोराेनाच्या उद्रेकात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग काम करीत असतानाच आता पावसाळ्यातील साथरोगाचेही आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पावसाळ्यातील साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी सुरू केली आहे. गेल्या तीन वर्षांतील साथीचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.
दीड वर्षांपासून कोरोनामुळे आरोग्य विभाग पूर्णत: व्यस्त आहे. आता पावसाळ्यातील साथरोग नियंत्रणासाठी पूर्वतयारीला आरोग्य विभाग लागला आहे. तीन वर्षांतील पावसाळ्यात साथीचा उद्रेक झालेल्या गावांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू ,डेंग्यूसदृश या आजारात गॅस्ट्रो, रूबेला, गोवर, अन्नातून विषबाधा या साथीच्या आजारांचा सामुदायिक प्रसार होण्याची शक्यता असते. त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग उपाययोजना करून ठेवत असते. यासाठी जिल्हा पातळीवरून तातडीचा औषधांचा पुरवठा करण्याबाबत सोबतच स्वतंत्र पथके तैनात आहेत. तालुकापातळीवर आरोग्य अधिकारी आणि त्यांचे पथक काही साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. साथजन्य आजारांवर उपचार करण्यासाठी औषधांचाही प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरवठा केला आहे.