राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान : १७,७४७ मृद नमुन्यांची तपासणीअमरावती : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४०० गावांमधील १७ हजार ७४७ मृद नमुन्यांची कृषी विभागाद्वारा तपासणी पूर्ण करण्यात आली. या नमुन्यांच्या आरोग्यपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. जागतिक मृददिनाचे औचित्य साधून ५ डिसेंबर रोजी या पत्रिकांचे वितरण भातकुली येथे होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांचे शेतीयोग्य मृद आरोग्य परीक्षण करणे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पीकनिहाय खताच्या मात्रांची शिफारस करणे व सर्व शेतकऱ्यांना प्रत्येक तीन वर्षांनी त्यांच्या जमिनीची मृद आरोग्यपत्रिका उपलब्ध करणे, हा राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचा उद्देश आहे. माती हे वनस्पतींच्या वाढीसाठी अन्नद्राव्यांचा पुरवठा करणारे सजीव नैसर्गिक माध्यम आहे. या नैसर्गिक साधन सामग्रीच्या व्यवस्थापनासाठी मृद परीक्षण हे खताचा वापर व व्यवस्थापनासह सहकार्य करणारा एक भाग आहे. जमिनीचे आरोग्य टिकविणे. पर्यायाने जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म टिकविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या मृद आरोग्य परीक्षणात जमिनीचे रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्ये व सूक्ष्म मूलद्रव्ये कमतरता स्थितीची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण, मृद नमुने काढण्यासाठी प्रशिक्षण, शिफारशीनुसार अन्नद्रव्यांच्या वापरास आर्थिक सहाय्य क्षमतावृध्दी, नियमित संनियंत्रण व मूल्यमापन हे घटक अपेक्षित आहेत. तसेच मृद विश्लेषणामध्ये जमिनीची क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये तांबे, लोह, मंगल व जस्त या घटकांची तपासणी करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)
जमिनीची आरोग्यपत्रिका तयार
By admin | Published: December 04, 2015 12:38 AM