अमरावती : विभागात १७ ते २८ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे विभागातील सोयाबीन, कापूस, ज्वारी या प्रमुख पिकांसह भाजीपाला, हळदी आणि फळपिकांचे ७२ टक्के क्षेत्रात नुकसान झालेले आहे. या बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी गुरुवारी कापूस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी. सिंह दाखल झाले. तीन दिवस त्यांचा दौरा राहणार आहे. या अनुषंगाने आढावा बैठकीत शासन निकषानुसार १८०४ कोटींंच्या मदतीची आवश्यकता असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले.
या बैठकीला विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त गजेंद्र बावणे, संजय पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे आदी उपस्थित होते. विभागात खरीप हंगामातील लागवडीखालील ३१ लाख १८ हजार ७९७ हेक्टर क्षेत्रापैकी २२ लाख ४४ हजार ४३६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. विभागात सर्वाधिक सुमारे ९१ टक्के नुकसान सोयाबीनचे झाले आहे.
बुलडाणा, अकोला जिल्ह्यात जवळपास पूर्णत: नुकसान झाले आहे, तर अमरावती, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. ज्वारीचे ८४ टक्के व बुलडाणा, अकोला जिल्ह्यात कापसाचे जवळपास संपूर्णत: नुकसान झाले आहे. विभागात ४०३२ हेक्टर संत्रा, ४,४६४ हेक्टर इतर फळपिके असे एकूण ८,४९७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली. या बैठकीनंतर पथक विभागातील पाहणीसाठी रवाना झाले.
पथक आज अकोला, बुलडाणा जिल्ह्यातकेंद्रीय पथकाचे सदस्य शनिवारी अकोला तालुक्यात म्हैसपूर, कापसी तलाव, गोरेगाव खुर्द व दुपारी बाळापूर तालुक्यात भारतपूर, नकाशी, वाडेगाव, कासारखेडा खामगाव तालुक्यात कोलोरी, टेंभुर्णी सुटाळा व रविवारी चिखली तालुक्यात केलवळ, हातणी, आमखेड व व मेहकर तालुक्यात महागाव, बाळखेड व वाशीम तालुक्यात नागठाणा व वांगी येथील बाधित शेतीपिकांची पाहणी करणार आहेत. शुक्रवारी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील दाभा, जळू, जसापूर, माहुली चोर, व यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी, नेर, मोझर, घारेफळ, सातेफळ या गावांतील बाधित पिकांची पाहणी केली.