अमरावती : संत गाडगेबाबा यांच्या संस्थेत काम करायला मिळणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे, महाराजांची दशसूत्री, त्यांचे कार्य व विचारानुसार मिशनचे कार्य पुढे नेण्याचा संपूर्ण प्रयत्न करू, अशी भावना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. संस्थेच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी ठाणे जिल्ह्यातील भिवाळी- वज्रेश्वरी येथे झालेल्या श्री गाडगे महाराज मिशनच्या सर्वसाधारण सभेत ना. ठाकूर यांची अध्यक्षपदी व मधुसूदन मोहिते-पाटील यांची चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली.
ना. ठाकूर यांनी संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगाव येथील समाधीस्थळ विकसित करून ोतेथे शासनामार्फत सोयीसुविधा उभारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोहिते -पाटील हे १९९२ पासून मिशनचे संचालक आहेत. त्यांनी नऊ वर्षे मिशनच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. मिशनचे माजी चेअरमन जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, राष्ट्रीय कीर्तनकार जिजाबा पाटील सोहोलीकर, राजारामबापू घोंगटे यांचा त्यांना वारसा लाभला आहे. मिशनची नव्या कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष-उत्तमराव देशमुख, सचिव- विश्वनाथ नाचवणे, सचिन घोंगटे. खजिनदार ज्ञानदेव महाकाळ, अशोक पाटील. सदस्य-अश्विनभाई मेहता,मारोती शिंदे,चंद्रकांत माने, विजय औटी, सुनील बायस्कर, चंद्रकला पाचंगे हे आहेत. यापूर्वी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, अच्युतराव देशमुख, यशवंतराव माने, विश्वनाथ वाघ महाराज यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचे कार्यभार सांभाळला आहे.
बॉक्स
ना. ठाकूर यांचे संस्थेला सदोदित सहकार्य
संत गाडगेबाबांनी १९५२ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेमार्फत राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विशेषतः आदिवासी, भटक्या विमुक्तांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, बालकाश्रम, वृद्धाश्रम, धर्मशाळा, अन्नदान सदावर्त, गोरक्षण इत्यादी उपक्रम राबविले जातात. या संस्थेला ना. यशोमती ठाकूर यांचे संस्थेच्या कार्यात सदोदित सहकार्य लाभले असल्याचे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.