लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात गत १० ते १५ वर्षांपासून एकाच टेबलवर चिकटून बसलेल्या ८५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या २७ जानेवारी रोजीच्या आदेशान्वये कुलसचिवांनी केल्या आहेत. मात्र, मलईदार टेबल हातून जाता कामा नये, यासाठी कुलसचिवांवर बदली आदेश रद्द करण्यासाठी दबावतंत्र आणले गेले. परिणामी सोमवारी एका लिपिकाच्या दबावापुढे विद्यापीठ प्रशासन झुकले आणि बदली आदेश स्थगित केला. विद्यापीठ प्रशासनाच्या कारभारात आपपरभाव दिसून येत आहे.कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी एकाच वेळी ८५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून मोठा धाडसी निर्णय घेतला आहे. मात्र, बजेटपूर्वी कर्मचाऱ्यांच्या बदल्या योग्य नाहीत, असा अफलातून सूर आळवण्यात आला. बदल्यांमुळे कामकाज ठप्प पडणार, असा अदृश्य मेसेज विद्यापीठात पसरविण्यात आला. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे कोणीच वाली नाही, अशांनी कुलसचिवांचे बदली आदेश ‘सर आंखों पर’ असे मानत बदली झालेल्या जागी रुजू होऊन कर्तव्य बजावणे सुरू केले. तथापि, ज्या कर्मचाऱ्याच्या अंगी पुढारीपण ठासून भरले आहे, अशांनी मात्र राजकारणाचा आधार घेत मिळालेले बदली आदेश रद्द करण्याची मोहीम फत्ते केली आहे. प्रशासन ‘बॅकफूट’वर आले, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली, हे विशेष.
महाविद्यालयीन विभागात आहे तरी काय?विद्यापीठाच्या महाविद्यालयीन विभागातून बदली होऊ नये, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांना का वाटते, हा तर खरा संशोधक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे संशोधनाचा विषय आहे. कुलसचिवांवर राजकीय दवाब आणून साेमवारी परीक्षा विभागात झालेले बदली आदेश तात्पुरते स्थगित करून महाविद्यालयीन विभागातच ती कायम ठेवली, असा नवा आदेश काढून घेतला. त्यामुळे महाविद्यालयीन विभागात किती मलईदार टेबल आहेत, या विषयावर पीएच.डी. केल्यास या विभागातील वास्तव समोर येईल. सोमवारी दोन अधिकारी, एका कर्मचाऱ्याचा बदली आदेश स्थगित करण्यात आला.