अमरावती : पूजा व उतारा केल्यास मूलबाळ होईल, अशी हमी देऊन एका विवाहितेवर चक्क नदीकाठी बलात्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्या मांत्रिकाने तेथे पूजादेखील मांडली. ७ जून रोजी दुपारी दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथील पूर्णा नदीकाठी ही धक्कादायक घटना घडली.
याप्रकरणी २३ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी ७ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास मांत्रिक संतोष गजानन बावने (३०, रा. कुकसा, ता. दर्यापूर) याच्याविरुद्ध बलात्कार, महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०२३ व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा नोंदविला. बुधवारीच रात्रीच मांत्रिकाला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तक्रारीनुसार, २३ वर्षीय विवाहिता बोरगाव मंजू परिसरातील रहिवासी आहे. तिला मुलबाळ होत नसल्याने एका नातेवाइकाने त्यांना कुकसा येथील तथाकथित मांत्रिक संतोष बावने याच्याबाबत माहिती दिली. त्याच्या अंगात नागोबाची सवारी येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते दाम्पत्य काही दिवसांपूर्वी दर्यापूर तालुक्यातील कुकसा येथे आले. तेथे आपल्या अंगात देवाची सवारी येते. पूजा व उतारा केल्यास तुला नक्की मूल होईल, मात्र, त्यासाठी पूजा करावी लागेल, त्याचा एकंदरीत ७० हजार रुपये खर्च येईल, असे भामट्या संतोष बावने याने त्या महिलेला सांगितले. त्यानुसार, ७ जूनपूर्वी आरोपी मांत्रिक संतोषने तीनदा पूजादेखील केल्या.
तिला नदीकाठी नेले
आपण आता शेवटची व निर्णायक पूजा पूर्णा नदीच्या काठी घालू, नदीच्या उदकाने झालेली पूजा पावन होते, फळते, अशी बतावणी संतोष बावने याने त्या अपत्यप्राप्तीसाठी इच्छुक असलेल्या दाम्पत्याकडे केली. मांत्रिकाने आधीच स्वत:च्या गावातील पूर्णा नदीकाठी तथाकथित पूजेसाठी आडोसा असणारी जागा शोधून ठेवली. त्यानंतर तो त्या दाम्पत्याला घेऊन नदीकाठी पोहोचला. तेथे त्याने अघोरी पूजादेखील मांडली. मात्र, पूजेसाठी आवश्यक काही साहित्य घरीच राहिले, अशी बतावणी त्याने केली. मला आणि तुझ्या पत्नीला पूजेतून उठता येणार नाही, त्यामुळे तू ते साहित्य घेऊन ये, असे म्हणत मांत्रिकाने तिच्या पतीला पिटाळले. तो दूर गेल्याची खात्री पटताच त्याने तिच्यावर बलात्कार केला. पती परतताच पत्नीने आपबिती कथन केली.