अमरावती : खरिपात कपाशीच्या क्षेत्रवाढीची शक्यता असतानाच बीटीच्या प्रत्येक पाकिटामागे ४३ रुपयांनी दरवाढ झालेली आहे. गतवर्षी ८१० रुपयांना मिळणारे ४७५ ग्रॅमचे पाकीट यंदा ८५३ रुपयांना शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. पश्चिम विदर्भात ११ लाख हेक्टर सरासरी कपाशी क्षेत्रासाठी ५६ लाख पाकिटांची आवश्यकता आहे. त्यामुळे बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना किमान २३.६९ कोटींचा नाहक भुर्दंड बसणार आहे.
पश्चिम विदर्भात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने ११.०१ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे व त्यासाठी किमान ५५.०९ लाख बीजी-२ या वाणाची पाकिटे लागणार आहे. त्यापूर्वी केंद्र शासनाने २४ मार्च २०२३ ला अधिसूचना काढून ४७५ ग्रॅमच्या बीजी-१६३५ व बीजी-२ च्या पाकिटासाठी ८५३ रुपये दर निश्चित केलेले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत विभागातील शेतकऱ्यांना कपाशीच्या बियाण्यासाठी २३.६९ कोटींचा फटका बसणार आहे.जिल्हानिहाय वाढलेला बीटी बियाण्यांचा खर्च
बीटी बियाण्याच्या दरवाढीने अमरावती जिल्ह्यात ५.५९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ९.७८ कोटी, अकोला ३.४४ कोटी, वाशिम ६०.५५ लाख तर बुलडाणा जिल्ह्यात ४.२७ कोटी रुपयांचा अतिरक्त भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. याशिवाय ग्रामीण भागात काही ठिकाणी जास्त किंमत घेत असल्याने तोदेखील खर्च वाढणार आहे.