लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निसर्गाच्या प्रकोपामुळे जुलै-ऑगस्टमध्ये बागांमधील संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली, तर उर्वरित फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकवून ठेवले. मात्र, आता संत्र्याला भाव नसल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ५० रुपये किलो असलेल्या संत्र्याचा दर केवळ २० रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादित होतात. मुबलक पाणी असल्याने पूर्णा नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणात संत्राबागा आहेत. मात्र, यावर्षीच्या सुरुवातीला लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक बंद होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात संत्री असूनदेखील खरेदीसाठी व्यापारी न आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने संत्र्याच्या आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. मात्र, जुलै ते ऑगस्ट महिन्यात संत्राबागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळ झाली. ३५ ते ५० टक्के संत्री गळून पडली होती.
मध्यंतरी अतिपावसामुळे फळांवर काळे व पिवळे डाग पडून फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली होती. त्यातून वाचलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदारांची कोंडी झाली आहे. १५०० ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याचे बोलले जात आहे. परराज्यातील बाजारपेठांमध्ये संत्र्याला उठाव नसल्याचे व्यापारी शेतकऱ्यांना सांगत आहेत. या दरावरही पाहिजे त्या प्रमाणात व्यापारी आले नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा अडचणीत सापडला आहे.संत्रा उत्पादन कुठे?चांदूर बाजार तालुक्यात घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, देऊरवाडा, काजळी, कोदोरी, माधान, सोनोरी, नानोरी, थुगाव पिंपरी
पूर्वी संत्री खरेदी करण्याकरिता व्यापारी वर्ग उत्पादकांच्या घरी चकरा घालत होते. यावर्षी उत्पादकांना व्यापाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. संत्र्याला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.- अण्णा खापरेसंत्राउत्पादक शेतकरी