लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांची हिरवी वांगी तीन रुपये किलो दराने घेऊन तीच बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. साधारणत: एका कट्ट्यात ५० किलो वांगी बसतात. मात्र, व्यापारी व मापारी यांच्या संगणमतामुळे ५० किलोचे पोते ४२ ते ४५ किलो असे मोजले जाते. त्यातच एक क्विंटलमागे दोन किलो वांगी सड म्हणून जास्त घेतली जातात. या पिळवणुुकीवर बाजार समितीने मौन धारण केले आहे.पथ्रोट परिसरात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हिरव्या वांगीची लागवड केली जाते. दरवर्षी विक्रमी पीक घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये असते. हिरव्या वांग्याच्या पिकाचा मोबदला रोखीने मिळत असल्यामुळे आणि खरीप हंगामाच्या वेळी तो कामी पडत असल्याने शेकडो शेतकरी हिरव्या वांग्याच्या पिकाकडे वळला आहे. बरेचसे मजूर मोठ्या शेतकऱ्यांची शेती वांगी उत्पादनाकरिता २० हजार रुपये मक्त्याने करतात.
वांगी पिकाच्या लागवणीपासून तर वांगे तोडणाऱ्या महिला मजुराला चार तासांचे प्रत्येकी २०० रुपये मजुरी, तर पुरुष वर्गाला वांगी डोहारणे, पोत्यात भरणे याकरिता ३०० ते ४०० रुपये, आठवड्यातून अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दोनदा कीटकनाशक फवारणी, १५ दिवसांतून एकदा एकरी दोन पोते मिश्रखताची मात्रा एवढा खर्च शेतकऱ्यांना करावाच लागतो. मात्र, व्यापाऱ्यांकडून पाच रुपये प्रतिकिलोचा भाव जरी मिळाला तरी शेतकरी तोट्यात आहेत. वांग्याच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी वांग्याचा तोडा न करता झाडाला सडू देत आहेत, तर काही गुराढोरांपुढे टाकत आहेत.वांग्याचे दर पाडण्याला व्यापारी व दलालच कारणीभूत आहे, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी.- अनूप अरबट, शेतकरी, पथ्रोट