लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम महाराष्ट्राला पुरपरिस्थितीचा फटका बसल्याचा परिणाम अमरावती येथील भाजीमंडईत जाणवू लागला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाल्यांना चांगला भाव मिळत असल्याने खासगी बाजारात दुप्पट दराने विक्री सुरू आहे. किरकोळ व्यावसायिक दामदुप्पट भावाने भाजीपाल्यांची विक्री करीत असल्याने सर्वच भाजीपाल्यांचे दर गगणाला भिडले आहे.गत आठवड्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे अनेक मार्ग बंद असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून येणाºया भाजीपाल्याची आवक मंदावली. विदर्भात यंदा पाऊस उशिरा आला व पावसाची अनियमितता कायम राहिल्याने भाजीपाल्यांचे दर कडाडले. इतवारा बाजारातील किरकोळ व्यावसायिकांकडून कांदा ४० ते ५० रुपये किलो विक्री करण्यात येत आहे. बटाटा १५ ते २० किलो, फुलकोबी सर्वाधिक १०० ते १२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. टमाटर ३०, ढेमसे ८०, वांगे ८०, हिरवी मिर्ची ८०, सांभार ९० ते १००, बरबटी शेंग ८०, भेंडी ६०, काकडी ४०, कारले ६०, गवार शेंग ८० रुपये प्रतिकिलो विक्री सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला दरवाढीचा फटका बसत आहे. मात्र, बाजार समितीत ज्या भावात भाजीपाला मिळतो त्यातुलनेत खासगी व्यावसायिक दामदुप्पट दराने विक्री करून शंभर टक्के नफा मिळवित आहे.
सर्वच भाजीपाल्यांचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:07 AM