लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सुमारे ४० आर इतकी जागा लाभलेली आणि राज्यातील सर्वात मोठी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जर्जर झाली आहे. ३५ वर्षापासून अनेक रुग्णांचे प्राण या इमारतीत वाचविण्यात आले आहे. आता या इमारतीचे तातडीने नूतनीकरण न झाल्यास कार्यरत डॉक्टर, कर्मचारी तसेच रुग्णांच्या जिवावर बेतेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तब्बल ३५ वर्षे जुनी झाली आहे. या इमारतीत आरोग्य केंद्रातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करीत असल्याचे चित्र आहे. नवीन इमारतीची मागणी ग्रामपंचायत सदस्य विमल पाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली.
मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांचा समावेश असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणवर्धन ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय करण्याची मागणीसुद्धा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी शासनाला पत्राद्वारे सादर केली होती. ही मागणी तत्काळ मंजूर करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विमल फाटकर यांनी देखील केली आहे.
३० हजार लोकसंख्येचा निकष कागदावरचएका आरोग्य केंद्रासाठी किमान ३० हजार लोकसंख्येचा निकष असताना, येथे तब्बल ८५ हजार लोकसंख्या असूनही विस्तार किंवा नूतनीकरणाचा एक शब्दही नाही. शासनाने धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन द्यावी, अशी मागणी विमल फाटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
८५ हजार नागरिक, ४४ गावेज्यांच्यावर रुग्णांना वाचवण्याची जबाबदारी, त्याच डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव शिकस्त इमारतीने धोक्यात आला आहे. आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे ८५ हजार इतकी लोकसंख्या येते. आठ उपकेंद्रे व ४४ गावांचा डोलारा या आरोग्य केंद्रावर असल्याने राज्यातून सर्वात मोठे असे आदिवासी भागातील एकमेव आरोग्य केंद्र ठरले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम १० जानेवारी १९८९ रोजी पूर्ण झाले. जवळपास ४० आर जागा आहे. प्रशस्त इमारत येथे उभी राहू शकते. पथ्रोट, येसूर्णा येथे नव्या इमारती झाल्या. त्यामुळे धामणगाव गढी येथे आरोग्य केंद्राऐवजी येथे उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालय करण्याची मागणी करण्यात आली आहे.