अनिल कडू
परतवाडा : अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२० मध्ये ज्या शाळांचा दर्जा प्राथमिक आहे अशा जिल्हा परिषदेच्या प्राथिमक शाळांमधील शिक्षकांनी मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अमरावती विभागात अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील तीन हजार प्राथमिक शिक्षकांची नावे मतदार यादित नोंदल्या गेली आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, चिखलदरामधील जि.प.प्राथमिक शिक्षकांची नावेही या शिक्षक मतदार यादित आली आहेत. या प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी करवून घेताना प्राथमिकच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी मतदार नोंदणी अर्जावर घेतली आहे. यात पंचायत समिती स्तरावरील प्रमुख असलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्या मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करताना डावलले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत अमरावती जिल्ह्यातील शेकडो प्राथमिक शिक्षकांची नावे आहेत. यांच्या नावासमोर जिल्हा प्राथमिकशाळा, असे गावाच्या नावासह नमूद आहे.
विधानपरिषद संहितेनुसार ज्या शाळांचा दर्जा माध्यमिक शाळा आहे. अशा माध्यमिक शाळा व त्यापुढील वरच्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनाच मतदानाचा हक्क आहे. यातील शिक्षकांचीच मतदार म्हणून नोंदणी केली जाते. माध्यमिक शाळेचा दर्जा असलेल्या शाळांमधील वर्ग ५ ते ८ ला शिकविणाऱ्या शिक्षकांनाही यात मतदानाचा हक्क आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेतील शिक्षकही यात मतदान करु शकतात. परंतु जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची मात्र यात मतदार म्हणून नोंदणी होऊ शकत नाही. त्यांना मतदान करता येत नाही. असे असतानाही मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी या प्राथमिक शिक्षकांची शिक्षक मतदारसंघात नोंदणी कशी केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट
माध्यमिक शाळेचा दर्जा प्राप्त शाळांतील शिक्षकांनाच शिक्षक मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी करता येते. यांनाच मतदानाचा अधिकार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी होऊ शकत नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार नाही.
- दिलीप कडू, अध्यक्ष, राज्य शिक्षक संघ
कोट
विधानपरिषद संहितेनुसार माध्यमिक शाळा व त्यापुढील शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांनाच शिक्षक मतदारसंघात मतदार होण्याच्या आणि मतदानाचा अधिकार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना तो अधिकार नाही.
- वसंतराव खोटरे, माजी शिक्षक आमदार, अमरावती
कोट
मतदार यादीत नाव असल्यामुळे त्या प्राथमिक शिक्षकांना मतदान करता आले. पण या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. विधानपरिषद संहितेनुसार जे शिक्षक, मतदार होऊ शकतात. अशांचीच नावे मतदार यादित राहतील.
- संदीपकुमार अपार, एस.डी.ओ.अचलूपर
कोट
शिक्षक मतदार नोंदणी असा अर्जाचा नमुना मुख्याध्यापक, प्राचार्य यांची स्वाक्षरी. त्यामुळे शिक्षक म्हणून आम्ही आमच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेतली आणि आमची मतदार म्हणून नोंदणी झाली. मतदार नाव आले. म्हणून मतदान केले.
-एम.बी.हिवे,जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परविधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा.
कोट
शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतदार यादीत अचलपूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथिमक शाळांतील काही शिक्षकांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना मतदार होण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार असल्यास तो सर्वच प्राथमिक शिक्षकांना मिळावा.
- रुपराव सावरकर, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, अचलपूर