लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा/ अमरावती : ‘चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि सभेला उपस्थित सर्व बंधू, भगिनींना माझा जय गुरुदेव’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमाची ही भूमी असून बलिदानाची गाथा सांगणाऱ्या आष्टी (शहीद) गावाची प्रेरणा आहे. गेल्या दहा वर्षांत आपण स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून महिलांसाठी एक चळवळ उभारली असून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध क्षेत्रातील तीन कोटी भगिनींना लखपतीदीदी बनविणार ही मोदीची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.
वर्धा आणि अमरावती मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक प्रचाराची विदर्भातील तिसरी सभा शुक्रवारी सायंकाळी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे पार पडली. काँग्रेसने आजवर सामान्य माणसाची थट्टाच केली आहे. मात्र. गेल्या दहा वर्षांत चित्र बदलले आहे. देश आत्मनिर्भर होऊ लागला आहे.
गॅरंटी हा आपल्यासाठी तीन अक्षरांचा खेळ नसून देशाचा विकास करण्याचा संकल्प आहे. पुढील पाच वर्षांत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत. प्रत्येक घरात पाण्याचा नळ पोहोचलेला असेल, अशी तरतूद करण्यात आली आहे. ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या प्रत्येक वृद्धाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार दिला जाईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
आता घरोघरी पाइपने पोहोचणार गॅसआधी प्रत्येकाला गॅस सिलिंडर देण्याचे काम एनडीए सरकारने केले आहे. भविष्यात प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. काँग्रेसने विदर्भाची नेहमी उपेक्षाच केली आहे. त्यामुळे त्यांना जनतेने नाकारले. मात्र गेल्या दहा वर्षांत विदर्भाचाही झपाट्याने विकास होत असल्याचे आपण बघताहात. इंडी आघाडीच्या नेत्यांकडे विकासावर बोलण्यासाठी काही नाही.त्यामुळेच आता ते शिवराळ भाषेचा वापर करू लागले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.
अमरावतीत टेक्सटाइल पार्क- देशात उभारल्या जाणाऱ्या टेक्सटाइल पार्कमध्ये अमरावतीचाही समावेश करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.- या पार्कमुळे लाखो लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.- अमरावतीची संत्रा आणि वर्धा जिल्ह्याची हळदीमुळे सर्वदूर ओळख असल्याची बाबही त्यांनी भाषणात नमूद केली.