- अमित कांडलकर गुरूकुंज मोझरी,अमरावती - अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्यावतीने यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रसंतांच्या महासमाधीवर नतमस्तक होण्याकरिता गुरूकुंज मोझरी तीर्थक्षेत्र स्थळी येण्याचे निमंत्रण अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्यावतीने नितीन गडकरींच्या माध्यमातून पाठविले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मिळाला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.२३ ते ३० आॅक्टोबर दरम्यान राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचा ५० वा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा सेवामंडळाचा मानस आहे. त्याबाबत सर्व राजकीय शासकीय नियमाच्या अधीन राहून त्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. त्याला शासनाच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, सुरक्षेच्या दृष्टीने शासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. त्यांनी गुरूकुंज मोझरी तीर्थक्षेत्रस्थळी सीबीआय, सीआयडी या गुप्तचर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून टेहळणी केली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आश्रमात आजवर आलेल्या दिग्गज शासकीय नेत्यांची इत्थंभूत माहिती गोळा केली. आजपर्यंत गुरूकुंजात देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, शंकरदयाल शर्मा, डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, देशाचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण, प्रथम अर्थमंत्री सी.डी. देशमुख इत्यादींनी प्रामुख्याने भेटी दिल्या असून, महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रत्येकच मुख्यमंत्र्यांनी आजवर राष्ट्रसंतांच्या आश्रमाला भेट दिली आहे. त्याच बरोबर अनेक संतांनीही भेटी दिल्या आहेत. ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारोहाचे निमंत्रण घेवून काही दिवसातच अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाचे शिष्टमंडळ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामध्ये अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाचे कोषाध्यक्ष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, सरचिटणीस जनार्दन बोथे, सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुष्पाताई बोंडे यांचा समावेश राहील, असे सेवामंडळाच्यावतीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या महोत्सवाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहावे याकरिता सेवामंडळाच्यावतीने अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला आहे. २९ आॅक्टोबरला या महोत्सवातील गुरूदेव भक्तांसाठी सर्वात महत्वाचा ‘मौन श्रद्धांजलीचा’ कार्यक्रम राहणार आहे. त्यानिमित्ताने ५ लाखांच्यावर गुरूदेव या पावनभूमीत दरवर्षी उपस्थित राहतात. त्याचबरोबर ७०० च्या आसपास गुरूमाऊलीच्या पालखी यात्रा यानिमित्ताने गुरूकुंज आश्रमाला येतात. यंदा ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी समारोहामुळे त्याची संख्या द्विगुणित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 3:18 PM