अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लॉकडाऊनमध्येही कायम आहे. साडेतीन महिन्यानंतरही संसर्गात कमी आली नसल्याने जिल्हा कोरोनाचा हॉटस्पाट ठरला आहे. जिल्ह्यात संसर्गाची स्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे २० मे रोजी आढावा घेतला जाणार आहे.
अमरावती विभागात कोरोनाचा वाढता संसर्ग अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात अधिक आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनाद्वारा कठोर संचारबंदी लावली असतानाही संसर्गात तसूभरही कमी आलेली नाही. सोबतच जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, चाचण्यांमधील पाॅझिटिव्हिटी, मृत्यूचे प्रमाण, जिल्ह्याचा रिकव्हरी रेट, ऑक्सिजन बेडची स्थिती व ऑषधांची अद्ययावत स्थितीची माहिती पंतप्रधान व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहे. आवश्यक सूचनाही देणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.