लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपक्षीयांनीच रचलेल्या या कटकारस्थानाचे पाप काँग्रेसच्या माथी मारले जात आहे. अशा बोगस योजना काँग्रेसने कधीही राबविल्या नाहीत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली बंद पडलेल्या योजनांआडून गोरगरिबांची थट्टा चालविल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेंतर्गंत महिला व मुलींच्या बँक खात्यात दोन लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याच्या वावड्या मागील काही दिवसांपासून बडनेरा व ग्रामीण भागात उठत आहेत. या योजनेंतर्गत ६ ते ३२ वर्षे वयोगटातील मुलींना सदर रक्कम दिली जाणार असल्याचे सांगून, त्या योजनेचे अर्जही भरून घेण्यात येत आहेत. अर्ज केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण, शांती भवन, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठवावे, असेही नमूद करण्यात आले आहे. अर्जात आई-वडिलांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, राज्य, शैक्षणिक पात्रता, आधार क्रमांक, ई-मेल आयडी, प्रवर्ग, धर्म, जात, बँक खातेक्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, सरपंचाची स्वाक्षरीसुद्धा मागितली आहे. या योजनेशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसताना भाजप पदाधिकारी मात्र राजकीय द्वेषभावनेतून गैरसमज पसरवून बदनामी करीत आहेत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची मते घेतली. आता तीन वर्षात जनहितविरोधी धोरणांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मोदी व फडणवीस सरकारचा घसरता आलेख व भाजपला ‘बुरे दिन’ पुढ्यात दिसत असल्याने विविध आरोपांतून विरोधी पक्षाला बदनाम केले जात आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या जनआक्रोश मेळाव्यांना जनतेचा कौल पाहून ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पंतप्रधान बेटी बचाओ योजनेत काँग्रेसला खेचणाºयांची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य पुढे आणावे, अशी मागणी आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर व बबलू देशमुख यांनी केली.देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री भाजपचे; मग पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना काँग्रेस कशी राबविणार आहे? खोटंही रेटून बोला हा भाजपचा अजेंडाच आहे. आता जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. काँग्रेस पक्षावर भाजप बिनबुडाचे आरोप करीत आहे.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसा‘अच्छे दिन’च्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. सरकार भाजपचे, त्यांच्याच योजना; विरोधक कशाला त्या राबवतील, हा साधा प्रश्न आहे. पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजनेच्या नावावर फसवणूक होत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वेपंतप्रधान बेटी बचाओ योजनेशी काँग्रेसचा काडीचाही संबंध नसताना भाजपचे पदाधिकारी नाहक आमच्यावर खापर फोडत आहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी. यापुढे भाजपचे आरोप कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत.- बबलू देशमुखजिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस
पंतप्रधान बेटी बचाओ योजना हे भाजपचेच कटकारस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:52 PM
पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे,.....
ठळक मुद्देबुरे दिन : मोदी सरकारची लाट ओसरल्याने काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र