वाद पैशाचा : ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार चांदूररेल्वे : येथील स्व. मदनगोपाल मुंधडा महाविद्यालयात उसनवार रक्कम मागणीवरून प्राचार्य व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत शुक्रवारी बाचाबाची झाली. शेवटी दोघांनीही एकमेकांविरुद्ध चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. चांदूररेल्वे येथील मुंधडा महाविद्यालयातून पाटील सहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. २००५ साली सेवेत असताना ११ हजार रूपये संस्थेने उसनवार घेतले होते. याबाबत पाटील यांनी संस्थेचे प्रशासक एस. एन. दुतोंडे यांचेकडे रक्कम जमा असलेली परत देण्याबाबत महाविद्यालयाला मागणी केली. यासाठी आवश्यक आलेले दस्तऐवज घेऊन प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या कक्षात पाटील आले, हे पत्र थेट न देता पोस्टाने पाठवावे, असे सांगताच बाचाबाचीला सुरुवात झाली. याबाबत पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर कक्षात येऊन शिवीगाळ केल्याची तक्रार प्राचार्य जयंत कारमोरे यांनीही दाखल केली. तसेच पाटील यांनीही तक्रार दाखल केली. मात्र अद्याप या प्रकरणात कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी) संस्थेने चौकशी लावून निवाडा करावा सेवानिवृत्त मुख्य लिपिक कृष्णकुमार पाटील पत्र देण्याचे निमित्ताने महाविद्यालयात येऊन भांडण व शिवीगाळ करतात. त्यांना देय असलेली रक्कम त्यांना मिळेल त्यासाठी संस्थेकडे दाद मागितली. संस्थेने कर्मचाऱ्याकडून किंवा पोस्टाने पत्र पाठवावे. पाटील यांचे मुद्दे तथ्यहीन असून संस्थेने चौकशी लावून समोरासमोर निवाडा करावा, अशी प्रतिक्रिया प्राचार्य जयंत कारमोरे यांनी दिली.
प्राचार्य-सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत बाचाबाची
By admin | Published: January 03, 2016 12:43 AM