अमरावती : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन आविष्कारांचा वेध घेऊन संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे केले.
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, माजी आमदार बी.टी. देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उच्च शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, संस्थेला शंभर वर्षे पूर्ण होऊन शतकोत्तर वाटचाल सुरू झाली आहे. संस्थेचा आजवरचा इतिहास देदीप्यमान आहे. अमरावती परिसर ही संतांची भूमी आहे. येथे संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज तसेच शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सान्निध्याने ही भूमी पावन झाली आहे. स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे अनेक महापुरुष या महाविद्यालयात घडले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारी अनेक मोठी व्यक्तिमत्त्वे येथे घडली. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी देशभर आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केले आहे. विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणाचे स्वरूप सर्वस्पर्शी असावे. त्याचे सार्वत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. ज्ञान ही कोणाची मक्तेदारी नसून ज्ञान मिळवणे प्रत्येकाचा अधिकार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या स्मारकाच्या कोनशिलेचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच ‘संस्थेच्या पाऊलखुणा’ या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मंजुषा वाठ यांनी तर आभार डॉ. साधना कोल्हेकर यांनी मानले.