अमरावती : जिल्ह्यात सोमवारी उमेदवारी अर्जाची माघार झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर चिन्ह वाटपाची प्रक्रिया राहील. यात राष्ट्रीय व राज्य पक्षाचे चिन्हाव्यतिरीक्त मुक्त चिन्हामधून कोणतेही चिन्ह निवडण्याची उमेदवारांना मुभा आहे. यात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराला प्रथम चिन्ह मिळणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हापैकी कोणतेही चिन्ह निवडता येणार आहे. यामध्ये ज्या उमेदवाराने प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तेथून चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच्या क्रमाने उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्हवाटप केले जातील. दुसऱ्या उमेदवारानेसुद्धा पहिल्या पसंतीचे पहिल्या उमेदवाराला वाटप झालेले चिन्ह मागितले असेल तर त्यांना दुसऱ्या पसंतीचे चिन्ह देण्यात येणार आहे. त्यानंतरच्या उमेदवाराने मागितलेले चिन्ह आतापर्यंत कोणत्याच उमेदवाराला देण्यात आलेले नसेल तर त्याला त्याच्या पसंतीचे चिन्ह मिळणार आहे.
एखाद्या उमेदवाराने दिलेल्या पसंतीक्रमातील एकही चिन्ह वाटपासाठी उपलब्ध नसेल तर त्या उमेदवाराकडून वाटपासाठी शिल्लक असलेल्या चिन्हापैकी एका चिन्हाची पसंती लेखी स्वरुपात घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला त्या उमेदवाराला ते चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
- तर नोंदवहीच्या नोंदीनूसार ठरणार क्रम
एकापेक्षा अधिक उमेदवारांनी एकाचवेळी उमेदवारी सादर केली असेल अशावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा जो क्रमांक नोंदविलेला आहे, त्या क्रमानूसार उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागात निवडणूक लढवीत असल्यास त्यांना सारखेच चिन्ह वाटपात प्राधान्य राहणार असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.