अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागांतर्गत लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढून टाकण्याची माेहीम युद्धस्तरावर हाती घेण्यात आली आहे. आता रस्ते उड्डाणपूल, भुयारी मार्गाच्या पूल निर्मितीला प्राधान्य देण्यात येत आहे. या पायाभूत सुविधांमुळे गेल्या जून महिन्यात रेल्वेकडे शून्य अपघाताची नोंद करण्यात आली आहे, हे विशेष.
मध्य रेल्वेने जून २०२३ मध्ये सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक कामे हाताळली आहेत. मध्य रेल्वेने पाच लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करून त्याजागी ओव्हर ब्रिज बांधले आहे. तर एप्रिल ते जून २०२३ या दरम्यान १२ ओव्हर ब्रिज निर्माण करून ते वाहतुकीसाठी सज्ज करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे-दौंड रेल्वे मार्ग आणि नागपूर विभागातील इटारसी-आमला रेल्वे मार्गावर लेव्हल क्रॉसिंग फाटकांच्या जागी पुलाखाली रस्ता तयार करण्यात आला आहे.
नागपूर-वर्धा विभागात लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक १११ व ११६ तर पुणे विभागातील पुणे-मिरज विभाग लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांंक ८१ आणि ९२च्या जागी ओव्हर ब्रिज साकारण्यात आला आहे. बडनेरा जुनी वस्ती येथे ओव्हर ब्रिज निर्मितीचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. तर अमरावती गाेपालनगर, धामणगाव रेल्वे येथे लेव्हल क्रॉसिंग गेट्सच्या जागी ओव्हर ब्रिज मंजूर झाला असून, सर्वेक्षणाची कामे आटोपली आहेत.
डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिव्हाइस उपकरण
आग रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून डब्यांमध्ये स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन डिव्हाइस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत २४ डब्यात ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. १३७ पॉवर कार्सना स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टिम प्रदान करण्यात आली आहे. एलएचबी कोच, आयसीएफ पेंट्री कोचमध्ये ही यंत्रणा लावण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांच्या सुरक्षेसाठी ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रणाली
ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर प्रणाली ही त्या विभागात दुसऱ्या ट्रेनला परवानगी देण्यापूर्वी ट्रॅक विभाग रिकामा असल्याची खात्री करते. डिव्हाइसमधील सेन्सर ड्रायव्हर आणि गार्डच्या दोन्ही बाजूंनी त्यावरून जाणाऱ्यास एक्सलची संख्या तपासतात. जर संख्या जुळत नसेल तर ते त्रुटी किंवा अनियमितता दर्शवते. त्यामुळे मानवी चुका दूर होतात आणि स्थानकांदरम्यान गाड्यांची सुरक्षित हालचाली नियंत्रित होतात. ही प्रणाली आता पुणे विभागातील किर्लोस्करवाडी-भिलवडी विभागात जून-२०२३ मध्ये प्रदान करण्यात आली आहे.