लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित परिषदेला मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, गोव्यासह मराठवाड्यातील दोन जिल्हे आणि विदर्भातील सात जिल्ह्यांतील एकल महिला उपस्थित होत्या.मुंबई येथील अॅक्शन एड या संस्थेच्या निरजा भटनाकर व यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन वैशाली येडे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार बच्चू कडू, कमर फातिमा (मध्य प्रदेश), सीमा कुलकर्णी, किसान मित्रच्या डॉ. उपमा दिवाण, अपेक्षा होमिओ सोसायटीच्या डॉ. मधुकर गुबळे, संजीवनी पवार, मारोती चवरे, सुनील धनविजय, दीपाली शर्मा, भावना हस्तक, विलास लोखंडे उपस्थित होते.याप्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी संबोधित केले. राज्यातील ४० लाख महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने दोन कोटींची तरतूद केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या पर्वावर त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष रहाटकर यांनी दिली.यावेळी आमदार बच्चू कडू व आमदार यशोमती ठाकूर यांनी एकल महिलांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांच्या समस्या विधिमंडळात मांडण्याचे आश्वासन दिले. खासदार नवनीत रवि राणा यांनीसुद्धा महिलांना धीर देत संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले. राज्यातील ४० लाख महिलांचे पती कर्जापायी, आर्थिक संकटाचा सामना करू न शकल्याने मृत्यू पावले. त्यानंतर त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी या अर्धांगिनींवर आपसुकच आली. त्यामुळे विविध संकटांचा सामना करताना महिलांची वाताहत होत असल्याचा सूर परिषदेत निघाला.
महिला रोजगाराला प्राधान्य, दोन कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 1:27 AM
शेतकरी विधवा, परित्यक्ता व कुटुंबातून दुरावलेल्या एकल महिलांचे प्रश्न सरकारला कळावेत, वंचित-शोषित या वर्गासाठी शासनाने धोरण ठरवावे, या मुद्द्यावर अमरावती येथे एकल महिला किसान संघटनच्यावतीने रविवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देविजया रहाटकर : एकल महिला परिषद, धोरण ठरविण्याची अपेक्षा