अमरावती : गृह विभागाच्यावतीने कारागृहात बंंदिस्त कैद्यांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून विशेष माफीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, येथील मध्यवर्ती कारागृहात योग शिबिरात सहभागी झालेल्या कैद्यांनी योगाभ्यासाविषयी परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे बहुतांश कैदी विशेष माफीपासून वंचित राहिले आहेत.कारागृहाची दिनचर्या सूर्योदय ते सूर्यास्त अशी असली तरी कैद्यांची सुधारणा व पुर्नवसन अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याच श्रुखंलेत मध्यवर्ती कारागृहात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बहुतांश महिला, पुरुष कैदांनी सहभाग घेतला होता. शिबिरात सहभागी कैद्यांनी योग परीक्षा उत्तीर्ण केल्यास त्यांच्या शिक्षेत विशेष माफीची तरतूद आहे. परंतु येथील मध्यवर्ती कारागृहात योग शिबिरात सहभागी महिला, पुरूष बंदीजनांची योगासन परीक्षा घेण्यात आली नाही, हे विशेष. दरम्यान कारागृह विशेष पोलीस निरिक्षकांनी पत्र पाठवून योगासन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या बंदीजनांच्या विशेष माफीसाठी नावे पाठविण्यासंदर्भात कळविले आहे. मात्र, योगासन परीक्षा घेण्यात आली नसल्याने विशेष माफीसाठी कैद्यांची नावे कशी पाठवावी, असा सवाल कारागृह प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. योग शिबिरात सहभागी कैद्यांची योगासन परीक्षा घेण्यात यावी, याकरिता येथील पतंजली आणि ‘वंदे मातरम्’ या संस्थेला कळविले आहे. परंतु सहा महिन्या नंतरही योगासन परीक्षा घेण्यात न आल्याने कैदी शिक्षेच्या माफीपासून वंचित राहात आहेत. मध्यवर्ती कारागृहात दैनंदिन योग शिबिरात सुमारे २५ महिला बंदी सहभागी होत असल्याची माहिती आहे.
योग परीक्षेअभावी कैदी विशेष माफीपासून वंचित
By admin | Published: June 16, 2016 12:09 AM