अमरावती : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती जिल्हा दौरा निश्चित झाला असून त्यांच्या आगमणानिमित्त पूर्वतयारी सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यामध्ये लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील समस्यायांचे अहवाल विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याना सादर केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता अमरावतीत आगमन होत आहे. त्यांच्या आगमणाच्या पूर्वतयारीची सभा बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी आमदार सुनील देशमुख, प्रवीण पोटे, अनिल बोंडे, रवी राणा, रमेश बुंदिले, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, महापौर चरणजित कौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, रवींद्र धुरजड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री जिल्ह्यात येत असल्याने त्यांना अमरावती जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत प्रस्ताव देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. यामध्ये ६ विषय प्रकर्षाने मांडण्यात येणार आहेत. एलबीटीचा मुद्दा, आरोग्य सुविधा, रस्ते, स्मार्ट सिटीविषयी, विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा शिक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस उत्पादनात झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा, सिंचन प्रकल्पांचा प्रश्न, संत्रा प्रक्रिया प्रकल्पावर विशेष चर्चा, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न आदी मुद्यांचा यामध्ये समावेश राहणार आहे. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मुख्यमंत्री धारणीकडे प्रयाण करतील. तेथील समस्या जाणून पुढे मोर्शीला संत्रा उत्पादन व विक्रीसाठी बाजारपेठ व प्रक्रिया उद्योगाविषयी तेथील परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार जिल्ह्यातील समस्या
By admin | Published: November 26, 2014 10:59 PM