अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा (बुस्टर) डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे प्रथम मानकरी ठरलेले जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला मोहोड यांना प्रथम बुस्टर डोज देण्यात आला.
पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणार्या फ्रंटलाईन वर्क्सला ही लस दिली जात आहे. पहिल्या डोजनंतर २८ दिवसांनी दुसरा डोज दिला जातो. जिल्ह्यात १६ जानेवारीला या मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी ४४० हेल्थ केअर वर्कर्सनी लस घेतली. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. आतापर्यंत सुमारे १६ हजार २२२ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिली. पहिल्या दिवशी लसीकरण झालेल्या व्यक्तींना दुसरा डोज देण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्यासह अनेक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. पहिल्या टप्प्यात १६ हजार २६२ हेल्थ केअर वर्कर्सचे लसीकरण अपेक्षित आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. लसीकरणाचा दुसरा डोजही प्राप्त झाल्याने शरारीत प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कोरोनावर मात करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. ही लस सुरक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व कोविड योद्ध्यांनी तातडीने ही लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेद्वारा करण्यात आले आहे.
बॉक्स
अशी आहे लसीकरणाची प्रक्रिया
लसीकरणाचे टप्पे ठरविण्यात आलेले आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून एका तक्त्यात माहिती मागितली जाते. यात नाव, आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, मोबाईल नंबर, वय आणि पत्ता याची माहिती संकलीत करून ती कोविन अॅपवर अपलोड केली जाते. अॅपच्या माध्यमातून संबंधित केंद्रावर १०० कर्मचार्यांना एसएमएस पाठविला जातो. त्यात दिनांक, ठिकाण आणि वेळ नमूद असते.
बॉक्स
असे झाले लसीकरण
पहिल्या टप्प्यात १६,२६२ हेल्थ केअर वर्कर्सचे लसीकरण करण्यात येत आहे. यापैकी १०,८७१ जणांना लसीकरण करण्यात आले. याशिवाय दुसर्या टप्प्यातील महसूल व अन्य विभागाचे फ्रंट लाईन वर्कर्सला लसीकरण करण्यात येत आहे. यात ५,३५१ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
-------------------------------------------
अवकाळीमुळे हरभर्याचे नुकसान
ढगाळ वातावरणाने कीड, रोगांचाही धोका
अमरावती : विदर्भाच्या १०० मीटर उंचीवर चक्राकार वारे व कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. यासोबतच पुर्वेकडून बाष्पयुक्त वारे हवेच्या खालच्या स्तरात वाहत आहे. मध्य भारतावर खंडित वारे आहेत आणि ही हवामानप्रणाली नैऋत्याकडे सरकत आहे. या हवामानशास्त्रीय प्रणालीमूळे जिल्ह्यासह विदर्भात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत रबीच्या हरभर्याची संवगणी सुरू आहे. पावसामुळे या पिकाचे नुकसान होत आहे. प्राथमिक अंदाजात जिल्ह्यात तुरळक स्वरुपात नुकसान झालेले आहे. गव्हाचे पीक मात्र यातून बचावल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी ‘लोकमत’ला दिली. पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील व काही ठिकाणी गारपीटदेखील होऊ शकते, अशी शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.