अर्ज मागविले, नावे प्रस्तावित करण्यासाठी शोध समितीचे गठण
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू निवड प्रक्रिया प्रारंभ झाली असून, नावे प्रस्तावित करण्यासाठी शोध समितीचे गठण करण्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत विद्यापीठाला नवे कुलगुरू मिळतील, असे संकेत आहेत.
विद्यापीठाचा कारभार वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व अकोला या पाच जिल्ह्यांत विस्तारलेला आहे. ३९४ महाविद्यालये संलग्न असून, बुलडाणा येथे मॉडेल डिग्री कॉलेज आहे. दरवर्षी २.२५ लाख विद्यार्थी उच्चशिक्षण घेतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कुलगुरुपदासाठी नावे प्रस्तावित करण्यासाठी शोध समितीचे गठण केले आहे. ही शोध समिती २७ मे २००९ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रानुसार कुलगुरुपदासाठी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व या पदासाठी अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या तसचे आव्हानात्मक काम करण्यास इच्छुक अशा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व्यक्तींकडून अर्ज मागवित आहेत. हे अर्ज विहित नमुन्यातील आवश्यक कागदपत्रांसह चार प्रतीत शोध समितीने नेमलेले संपर्क अधिकारी तथा वाराणसी येथील स्कूल ऑफ बायोकेमिकल इंजिनीअरिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीएचयू) चे प्रोफेसर विकास कुमार दुबे यांच्याकडे ५ जुलै २०२१ पर्यंत दाखल होतील.
तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात आला. त्यांच्या जागी नव्याने कुलगुरू नेमण्यात येणार आहेत. तूर्तास कुलगुरुपदाचा प्रभार अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू विलास भाले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.