अमरावती : येथील नांदगाव पेठ स्थित पंचतारांकित एमआयडीसीमध्ये पतंजलीच्या माध्यमातून संत्रा, डाळिंब, केळी, आवळा, सीताफळ, सोयाबीन, मका, मूग आदी फळे व पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी स्वामी रामदेव महाराज यांना केली. मुंबई येथे आमदार राणांनी रविवारी रामदेव महाराज यांची भेट घेऊन जिल्हावासीयांची कैफियत त्यांच्या पुढ्यात मांडली.
दरम्यान, रामदेव महाराज यांनी लवकरच अमरावती येथे येऊन जागेची पाहणी करू अशी ग्वाही आमदार रवि राणा यांना दिली. मेळघाटातील आदिवासींना स्वाभिमानाचा रोजगार मिळावा यासाठी मोहफुल या औषधयुक्त नैसर्गिक फळांचा वापर करून त्यापासून आयुर्वेदिक औषधी निर्माण केल्यास धारणी-चिखलदरासह मेळघाटातील आदिवासींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागणार नाही, अशी भूमिका आमदार रवि राणा यांनी स्वामी रामदेव महाराज यांच्याकडे मांडली.
------------
बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल
या उद्योगामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल आणि हजारो स्थानिकांना काम मिळेल. त्यामुळे पतंजलीने नांदगाव पेठ पंचतारांकित एमआयडीसीमध्ये मोठा कृषी उत्पादन प्रक्रिया प्रकल्प सुरू करावा, अशी आग्रही मागणी आमदार रवी राणा यांनी स्वामी रामदेव महाराज यांना केली.