अमरावती : प्लास्टिकचा वापर होऊच नये व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत आस्था निर्माण व्हावी, या हेतूने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्यावतीने महिला स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून ३० हजार कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यात आली. या पिशव्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असून, या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पर्यावरण दिनानिमित्त शनिवारी करण्यात आला.
कोरोना साथीमुळे टाळेबंदी काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील ३ लोकसंचालित साधन केंद्रांना ३० हजार पिशव्या शिवण्याचे काम देण्यात आले. त्यासाठी महिलांना १५० ते २०० रुपये प्रतिदिवस काम मिळाले. तसेच या कापडी पिशव्या जिल्ह्यातील महापालिका, सर्व नगर परिषद क्षेत्रातील शाळांमध्ये विनामूल्य वाटण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'माविम'चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले.या वेळी , सहा.उपवनसंरक्षक ज्योती पवार प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या सहा.जिल्हा समन्वय अधिकारी रामगोपाल साहू, कार्यक्रम अधिकारी ऋषिकेश घ्यार, कार्यक्रम सल्लागार सौरभ गुप्ता, परिवर्तन लोक संचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक अंजू गणवीर, झेप लोक संचालित साधन केंद्र व्यवस्थापक निर्मला राऊत, श्रीमती शारदा सातंगे, मायग्रंत सपोर्ट सेंटर केंद्र समन्वयक अनुजा देशमुख तसेच सहयोगिनी स्टाफ उपस्थित होते