धामणगाव रेल्वे : निसर्गाच्या प्रकोपाने चार वर्षांपासून सतत नापिकी त्यात सावकाराचे घेतलेले कर्ज, चक्रवाढ व्याज व बाप-लेकीचा सावकारी कर्जाच्या चिंतेमुळे झालेला मृत्यू या ज्वलंत विषयावर ‘अमावस्या - एक पिसाळलेली रात्र’ या लघुपटाची निर्मिती तालुक्यातील वसाड, दाभाड्यातील ‘ युवकांनी केली आहे.
धामणगाव तालुक्यात बारा वर्षांमध्ये शंभरावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सावकाराच्या जाचापायी २० ते २२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. वसाड, दाभाडा या भागातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, सावकारांना चाप बसावी, समाज जागृती व्हावी, यासाठी या दोन्ही गावातील नवयुवकांनी काही ५०, ६० वर्षांतील वृद्धांना सोबत घेऊन 'अमावस्या एक पिसाळलेली रात्र' या ३० मिनिटांच्या लघुपटाची निर्मिती केली आहे
कोरोनाकाळात ग्रामीण भागातील फसवणूक, सावकारी चक्रवाढ व्याज याबाबत जनजागृती व्हावी तसेच ग्रामीण भागातील युवक कला क्षेत्रात मागे नाही, हे लघुपट निर्मितीतून दाखवून द्यायचे आहे, असे निर्माते सुहास ठोसर व निर्देशक लीलाधर भेंडे यांनी सांगितले. बंडू हेंबाडे, मयूर जुनघरे, प्रियंका हेंबाडे, निखिल जुनघरे, हेमंत भेंडे, अरुण जुनघरे, विलास उतके, अभय जुनघरे, वैभव हेंबाडे, अतुल नेवारे या कलाकारांचा समावेश आहे. समाज माध्यमावर हा लघुपट अधिकच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.