सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : नियोजनाचा अभाव
मोर्शी : शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करूनच आपली प्रतिष्ठाने उघडावी, अशी सक्ती नगर परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. त्याअनुषंगाने शहरातील समस्त व्यापारी आपली प्रतिष्ठाने उघडण्यापूर्वी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करून घेण्यासाठी पळाले. मात्र, त्याठिकाणी गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णत: फज्जा उडाला.
गुरुवारी संध्याकाळी व्यापारी जेव्हा आपली दुकाने लॉकडाऊनच्या सबबीखाली बंद करीत होते तेव्हा नगर परिषदेचा एक कर्मचारी बाजारपेठेत येऊन उद्या कोरोना टेस्ट केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाही, असे सांगून गेला. शुक्रवारी सकाळी ध्वनिक्षेपकाद्वारे तशी घोषणाही झाली, कॉलनी परिसरातील दुकाने बंद करण्यात आली. याची चर्चा मुख्य बाजारपेठेत झाली आणि सर्व व्यापारी कोरोना टेस्टकरिता उपजिल्हा रुग्णालयात पळाले. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. पालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते, पण, गर्दी आवाक्याबाहेर गेल्याने ते हतबल होऊन परतले.
एकीकडे दुकानदारांना ग्राहक सामाजिक अंतर ठेवू शकत नसल्याच्या कारणावरून दंड ठोठावला जात असताना, रुग्णालयात हा प्रकार प्रशासनाने सहन करून घेतला. जेव्हा व्यवसायिक उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी गेले, तेथील डॉक्टरांनी दररोज १०० जणांची तपासणी करण्यात येईल, असे सांगण्यात आले. उर्वरित लोकांना मात्र तेथून परत करण्यात आले. कोरोना तपासणीचे असेच नियोजन राहिल्यास संपूर्ण व्यावसायिकांच्या कोरोना तपासणीला एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी काय, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.
बॉक्स
तपासणीची वेळा निश्चित करण्याची मागणी
शहरात लहान-मोठे जवळपास तीन हजार व्यापारी आहेत. एकाच वेळेस सर्वांना फतवा काढून तपासणी करण्याचे आदेश देण्याऐवजी एक-एक परिसर घेऊन तपासणी करून घेता आली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. प्रतिष्ठाने उघडण्याची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत असून, व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी सकाळी ७ ते ९ संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत करण्यात यावी, जेणेकरून व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही, असे मत पालिकेचे उपाध्यक्ष आप्पा गेडाम यांनी व्यक्त केले.
पान ३ साठी