अमरावती : शासकीय तथा खासगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच वेतनाची रक्कम शुक्रवारपासून जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या खात्यात ही रक्कम अदा करण्यात येत आहे. याचा अमरावती विभागातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा व अमरावती जिल्ह्यांतील शिक्षकांना लाभ मिळणार आहे.
राज्याच्या वित्त विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी देय होणारे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान २५ ऑक्टोबरपूर्वी करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने अमरावतीचे उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालकांनी प्राध्यापकांसह तासिका तत्त्वावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याबाबत नियोजन केले आहे. या निर्णयामुळे उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे डेटा हस्तांतरणाची प्रक्रियालेखा व कोषागारे यांच्याद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व संगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांच्याकडील डेटा मानगेड हाऊसिंगचे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येत असल्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजी देय होणारे वेतन आणि निवृत्तीवेतन शुक्रवारपासून अदा केले जात आहे.
"अमरावती विभागातील प्राध्यापकांचे वेतन दिवाळीच्या आठवडाभर आधी देण्याचे नियाेजन आहे. त्यातही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसहित सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन महाविद्यालयातील प्राचार्यांच्या खात्यात जमा होत आहे. निवृत्तिवेतनधारकांचे वेतनही जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे."- डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण, अमरावती