भातकुली : तालुक्यातील पेढी नदीवर होणाऱ्या प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आता एकरी १० लाख रूपयांची भाववाढ देण्यात येणार आहे.भातकुली तालुक्यातील पेढी नदीवर होत असलेल्या पेढी प्रकल्पाचे बांधकाम प्रगतिपथावर असून या प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील कामुंजा, सावरखेड, कुंड, वजरखेड, वासेवाडी, अळणगाव, भातकुली, हातुर्णा, गौरखेडा या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित झाल्या. त्यांना जमिनीचा वाढीव मिळण्यासाठी आ. रवी राणा यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक बोलावली होती. यामध्ये ६०० शेतकरी उपस्थित होते. बैठकीत आ. रवी राणा यांनी सुरुवातीपासूनच पेढी प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा व त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यासमोर सविस्तर मांडल्यात. जोपर्यंत पेढी प्रकल्पग्रस्तांचे समाधान होणार नाही व त्यांच्या मागण्यांवर शासन तथा प्रशासन यथायोग्य कार्यवाही करणार नाही तोपर्यंत पेढी प्रकल्पाचे काम थांबविण्यात यावे, असा पवित्रा त्यांनी बैठकीमध्ये घेतला. आ. राणांच्या मागणीला ६०० शेतकऱ्यांनी समर्थन देत सभागृहात एकच मागणी रेटून धरली. त्यावर जिल्हाधिकारी किरणकुमार गित्ते यांनी २२ जानेवारीपर्यंत पेढी प्रकल्पावर कुठलीच कामे होणार नाही, असा निर्णय देऊन स्थगिती दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे चारपट भाववाढ देण्याबाबत निकष व व्याख्या पेढी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समक्ष स्पष्ट करून साधारणत: प्रत्येकी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला एकरी १० लक्ष रूपये भाववाढ मिळणार असल्याचे सांगितले. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या बाजूने समाधानकारक निर्णय झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आ. राणा यांनी बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासनदरबारी यशस्वीपणे मांडल्याबद्दल सर्व उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण बैठकीला सुनील राणा, स्वीय सहाय्यक उमेश ढोणे, रामदासजी मानकर, वसंतराव मानकर, प्रशांत रोकडे, ज्ञानेश्वर कळसकर, विकास मानकर, अविनाश सनके, विनोद जायलवाल, गोवर्धन मानकर, बबलू दुर्गे इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते तसेच शासनातर्फे उपजिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, विनोद शिरभाते, मोहन पातूरकर, कार्यकारी अभियंता राठी, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे भातकुली, प्रवीण ठाकरे उपविभागीय अधिकारी अमरावती, भातकुलीचे तहसीलदार येडे, अमरावतीचे तहसीलदार सुरेश बागडे, भातकुली गटविकास अधिकारी चौधरी, अमरावती गटविकास अधिकारी काकडे, भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पेढी प्रकल्पग्रस्तांना मिळणार भाववाढ
By admin | Published: January 18, 2015 10:30 PM