महापालिकेत यादी तयार : शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठतेनुसार न्यायअमरावती : महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील ४० कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. यात सफाई कामगार, शिपाई, ड्रेसर, नाला कुलींना न्याय देण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.सामान्य प्रशासन विभागाने एक, दोन नव्हे तर वर्ग ४ मधील ४० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी प्रशासकीय फाईलींचा प्रवास सुरु केला आहे. काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात आहे. सेवेत रुजू झाल्यानंतर आजतागायत पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जात आहे. महापालिका आयुक्तांनी या फाईलवर स्वाक्षरी करताच पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळेल, अशी माहिती आहे. चतुर्थ श्रेणीतून तृतीय श्रेणीत पदोन्नती मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार कामे सोपविली जाणार आहेत. सर्वच विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत कोणताही घोळ अथवा नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासन लक्ष ठेऊन आहे.पुढील आठवड्यात चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)
४० चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2016 12:24 AM