लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: १५ व्या वित्त आयोगांतर्गत सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास/स्मशानभूमीच्या विकासामध्ये हिंदू स्मशान संस्थांमध्ये गॅस दाहिनी बसविणे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासाठी ५० लाखांचा निधी अपेक्षित आहे. हा प्रशासकीय विषय मंगळवारच्या आमसभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रामधील हिंदू स्मशानभूमी ही कोरोनामुळे मृत झालेल्यांवर अंत्यसंस्कारासाठी आरक्षित करण्यात आली आहे. याठिकाणी सन २०१५-१६मध्ये दोन युनिट संस्थेतर्फे बसविण्यात आलेली आहेत. या दोन्ही युनिटमध्ये अंत्यविधी पार पाडला जातो. सात महिन्यांपासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सद्यस्थितीत ही दोन्ही युनिट अपुरी पडत आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते.
याबाबत महापालिका प्रशासनाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व सध्या ज्याठिकाणी दोन युनिट आहेत, त्याच्या पश्चिम बाजूला तिसरे युनिट बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे हा विषय या आमसभेत प्रशासनाकडून मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
बॉक्स
असा येणार खर्च
गॅस दाहिनीसाठी सर्व करांचा समावेश करणे, आरसीसी शेड उभारणे, ६०० लीटरची पाण्याची टाकी, नालीचे बांधकाम, पाण्याची पाईपलाईन, विद्युत पुरवठा, महावितरणकडे अनामत रक्कम, एलपीजी गॅस युनिटकरिता शेड उभारणी अशा एकूण एका युनिटकरिता ५० लाखांच्या निधीची आवश्यकता आहे.