लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राकरिता साडेअकरा कोटींचा प्रकल्प प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळशास्त्रविभाग, उद्यानविद्या शाखा विभागप्रमुखांनी केंद्र शासनाकडे सादर केला आहे. हे संशोधन केंद्र उभे झाल्यास आदिवासी शेतकऱ्यांना अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होईल. श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारे संचालित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न अमरावती येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या अनुदानातून चिखलदरा क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीबाबत सलग दोन वर्षे शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष लागवड व संशोधन केले. या संशोधनात शेतकऱ्याला १० गुंठे क्षेत्रावर दोन लाखांचे उत्पादन मिळाले. संशोधनाची ही यशस्वीता पाहता, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा नावीन्यता परिषदेने मेळघाटातील ५० शेतकऱ्यांच्या शेतावर पथदर्शी प्रकल्प राबविला. त्या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने आदिवासी शेतकऱ्यांना पिकाबाबत विश्वास निर्माण झाला. त्यामुळे सहा वर्षांपासून शेतकरी स्वखर्चाने स्ट्रॉबेरी लागवड करीत आहेत. चिखलदरा हे पर्यटनस्थळ असल्याने स्थानिक बाजारात किंवा जागेवरच स्ट्रॉबेरी विकून चांगला नफा शेतकऱ्यांना होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार पटेल यांनी कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांंशी संपर्क साधून विद्यापीठाचे संशोधन केंद्र मेळघाटात व्हावे, अशी मागणी केली. त्या मागणीला प्रतिसाद देत विद्यापीठाने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) यांच्याकडे संशोधन केंद्राचा प्रस्ताव सादर केला. संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्ट्राबेरी उत्पादक शेतकऱ्यांकरिता तंत्रज्ञान केंद्राचा विकास, स्ट्राॅबेरी पिकात गुणवत्तापूर्ण उत्पादन वाढवून त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगास चालना, मृद् व्यवस्थापनाचा अभ्यास करून या पिकावर येणाऱ्या किडी व रोगांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना, स्ट्राॅबेरी लागवडीचा प्रचार व प्रसार आणि प्रशिक्षण तसेच कृषी पर्यटनाला चालना देऊन आदिवासी भागात रोजगार निर्मिती असे विविध उद्देश प्रत्यक्षात आणले जातील. संपूर्ण केंद्राकरिता शास्त्रज्ञ, अधिकारी आदी मनुष्यबळाची नियुक्ती तसेच प्रकल्प राबविण्याकरिता ११६०.१५ लाख रुपयांचा हा प्रस्ताव मंजुरीकरिता सादर केला आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याकरिता पाठपुरावा करावा, अशी मागणी आदिवासी शेतकऱ्यांकडून होत आहे.
स्ट्राॅबेरी संशोधन केंद्र निर्माण झाल्यास मेळघाटातील आदिवासी शेतकरी बांधवांना अतिशय कमी दरात रोपे उपलब्ध होतील तसेच स्ट्राॅबेरीच्या स्थानिक जाती विकसित करता येतील. शीतगृह, साठवणगृह तयार झाल्यास स्ट्राॅबेरीचे फळ जास्त दिवस टिकवून ठेवता येतील.- शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.