अमरावती :जिल्हा परिषदेतील विविध विभागात एकाच ठिकाणी सलग पाच वर्ष सेवापूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याचा विभाग तर एकाच टेबलवर तीन वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा टेबल बदलीसाठी सामान्य प्रशासन विभागाने १४० कर्मचाऱ्यांच्या खांदेपालट करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे सादर केला आहे. यावर सीईओंनी शिक्कामोर्तब करताच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी ठाणमांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून विविध विभागात सलग पाच वर्षापासून एकाच विभागात असलेले तसेच तीन वर्षापासून एकच टेबल सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती विभाग प्रमुखामार्फत मागविण्यात आली होती. यानुसार विविध विभागाच्या प्रमुखांनी १४० कर्मचाऱ्यांची यादी जीएडीकडे सादर केली होती. प्राप्त यादीनुसार टेबल बदलीकरिता १०० व विभाग बदलासाठी ४० कर्मचारी पात्र असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाने ३० जून रोजी तयार केला आहे. त्यानुसार अंतिम कारवाईसाठीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे अंतिम मंजुरी मिळताच एकाच विभागात पाच वर्षापासून ठाण मांडून असलेल्या विभाग तर सलग तीन वर्ष एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टेबल बदलविले जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या १४ विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी यांच्या मान्यतेची प्रतिक्षा लागली आहे.विशेष म्हणजे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा प्रभार असल्यामुळे कामाची व्यस्तता आहे. त्यामुळे विभाग व टेबल बदलाच्या प्रस्तावावर सीईओकडून केव्हा शिक्कामोर्तब होते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.