- गणेश वासनिक
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत सात महाविद्यालये बंद करण्यासह नऊ अभ्यासक्रम गुंडाळण्याबाबत विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यावर १४ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. महाविद्यालयांमध्ये प्रवेश रोडावल्याने ही पावले उचलल्याचे बोलले जात आहे.विद्यापीठाने गठित केलेल्या चौकशी समितीच्या अहवालावरून शारीरिक शिक्षण महाविद्यालय (उमरखेड, जि. यवतमाळ), ईश्वरभाऊ देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय (दिग्रस, जि. यवतमाळ), कॉलेज आॅफ मॅनेजमेंट सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी (अकोला), कुमुदिनी भदे महाविद्यालय (अकोला), डी.बी. भदे महाविद्यालय (अकोट, जि.अकोला), सातपुडा शिक्षण संस्थाद्वारे संचालित विज्ञान महाविद्यालय (जळगाव जामोद, जि. बुलडाणा), विज्ञान (बी.सी.ए) महाविद्यालय (दर्यापूर, जि. अमरावती) अशी सात महाविद्यालये बंद करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यवतमाळ येथील डॉ. भाऊसाहेब नांदूरकर कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये बी.ई.चे तीन अभ्यासक्रम आणि एम.ई.चे दोन अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव आहे. पुसद (जि. यवतमाळ) येथील गुलाब नबी आझाद शिक्षण महाविद्यालयातील एम.एड अभ्यासक्रम, वाशिम येथील कै. अॅड. रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयातील एल.एल.बी. अभ्यासक्रम, शेगाव (जि. बुलडाणा) येथील सरस्वती कॉलेजमधील एम.सी.ए. भाग-२ अभ्यासक्रम, अमरावती येथील हरिकिसन मालू इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या एम.सी.ए. अभ्यासक्रम बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यापूर्वी शैक्षणिक संस्थाचालकांकडून अमरावती विद्यापीठात महाविद्यालय बंद आणि अभ्यासक्रम गुंडाळण्याची परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती गठित करून त्याबाबत चौकशी अहवाल प्राप्त केला आहे.आता ही महाविद्यालये आणि अभ्यासक्रम बंद करण्यासाठी व्यवस्थापन परिषद आणि त्यानंतर सिनेट सभागृहाची मान्यता घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने तयारी चालविली आहे. दरवर्षी महाविद्यालये बंद करण्याबाबतचे प्रस्ताव विद्यापीठांकडे सादर होत असून, गतवर्षी चार अभियांत्रिकी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय झाला होता, हे विशेष.राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषदेकडून आठ महाविद्यालयांची मान्यता गोठविलीसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आठ महाविद्यालयांची भोपाळ येथील राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, पश्चिम क्षेत्रीय समितीने मान्यता गोठविली आहे. यात अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील स्व. अनिल रामदास कांबे बी.एड. कॉलेज, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील श्री. गोविंदराव पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथील लोकहित बी.पी.एड. महाविद्यालय, यवतमाळचे लोहारा येथील श्री साई शिक्षण महाविद्यालय, दिग्रस येथील ईश्वर देशमुख शिक्षण महाविद्यालय, बुलडाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथील दादासाहेब रमेशसिंह शिक्षण महविद्यालय, बुलडाणा येथील विदर्भ युवक संस्थेचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच अमरावतीलगत बडनेरा-कोडेंश्वर मार्गावरील शहीद भगतसिंग शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांचा समावेश आहे.