लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आजोबा राधावल्लभजी सीए आहेत. त्यांची प्रेरणा व आदर्श घेऊन मला सीए व्हायचे असल्याचे वाणिज्य विभागात जिल्ह्यात प्रथम आलेल्या समृद्धी राजेश मुंधडा हिने सांगितले.समृद्धी ही येथील केशरबाई लाहोटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६०० पैकी ५८८ म्हणजेच ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील टॅक्स कन्सलटंट व आई गृहिणी आहे. आई, वडील, आजोबा यांचे अभ्यासामध्ये सहकार्य मिळाले. याशिवाय महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळाल्याने यश संपादन करु शकल्याचे समृद्धीने सांगितले. दहावीचा निकाल लागल्यानंतर दररोज तीन ते चार तास नियमित अभ्यास केला. खासगी कोचिंगचाही फायदा झाला. याशिवाय नियमित टेस्ट दिल्यात. यामधील चुका समजावून घेतल्या. याचा खूप फायदा झाला. पुढे सीए करायचे असल्याने त्यादृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याचे समृद्धी म्हणाली. वाचन व प्रवास हे समृद्धीचे आवडते छंद आहेत. याशिवाय अभ्यास करतांना कंटाळा आल्यास टीव्हीदेखील पाहते. याशिवाय बॅ़डमिंटन खेळ आवडत असल्याचे तिने सांगितले.