(फोटो)
अमरावती : आदिवासी फासेपारधी सुधार समिती, मंगरुळ चव्हाळा विरुद्ध एमएसआरडीसी असे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही सोमवारी रात्री समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या एनसीसी कंपनीच्या मजुरांनी ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेच्या पिण्याचे पाण्याची विहीर बुजविण्याचा प्रयत्न केला. या विहिरीत रात्रीच्या वेळी डिझेल व मुरूम टाकल्याचा आरोप संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले यांनी केला. संबंधितांवर कारवाईचे निवेदन मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
न्यायालयाच्या आदेशाशिवाय या विहिरीविषयी कोणताही निर्णय कोणालाही घेता येत नाही. मात्र, एनसीसी कंपनीच्या मालकांनी ही विहीर बुजविण्यास सांगितल्याने मजुरांनी ट्रक, जेसीबीच्या साहाय्याने विहीर बुजविण्याचा प्रयत्न केला. याला फासेपारधी बांधवांनी व विद्यार्थ्यांनी विरोध केला असता, सोमवारी रात्रीच्या वेळी ताफा आणून विहिरीत डिझेल टाकले व मुरूमही टाकल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याचे मतीन भोसले यांनी सांगितले.
आत आश्रमशाळेतील विद्यार्थी व कर्मचारी यांना पिण्यासाठी व अन्न शिजविण्यासाठी पाणी नाही. या कंपनीने अमानवीय कृत्य केल्याचा आरोप भोसले यांनी केला. त्यामुळे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.