स्थायी समिती निवडणूक : काँग्रेससह सहा सदस्य अनुपस्थित, मूळ करारावर शिक्कामोर्तबअमरावती : रावसाहेब शेखावत की संजय खोडके, या काँग्रेस नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईचा तिढा गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. महापालिका स्थायी समितीच्या सभापतिपदी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटचे अविनाश मार्डीकर अविरोध निवडून आले. तमाम राजकीय जाणकारांना धक्का देणाऱ्या या निर्णयाची शहरात दिवसभर शहरात खमंग चर्चा होती. स्थायी समितीच्या सभापतीपदावरुन काँग्रेसच्या उभयनेत्यांमध्ये पेटलेला वाद स्थायी समितीच्या निवडणुकीनंतरच शांत होईल, असे एकंदर चित्र होते. चुरशीच्या निवडणुकीची घडी आली नि शेखावत गटाच्या आसिफ तवक्कल यांचा उमेदवारी अर्ज परत घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी किरण गित्ते यांनी अवघ्या अर्ध्या तासात खोडके गटाचे अविनाश मार्डीकर अविरोध निवडून आल्याचे घोषित केले. या विजयामुळे संजय खोडके यांच्या मुत्सद्दी राजकारणाचा प्रत्यय पुन्हा एकदा शहरवासियांना आला. काँग्रेसचे निरीक्षक विजय वडेट्टीवार बुधवारी रात्री शहरात दाखल झाले. रात्री १ पर्यंत त्यांनी संबंधितांशी वैयक्तीक चर्चा केली. रावसाहेब शेखावत त्यांच्या भेटीला पोहोचले नाहीत. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्ष निवडणूकच होईल, असे चित्र निर्माण झाले होते. गुरुवारी सकाळी ११ वाजतापूर्वी काँग्रेसकडून आसिफ तवक्कल आणि राकाँ फ्रंटकडून अविनाश मार्डीकर यांनी ‘स्टँडिंग चेअरमन’ म्हणून उमेदवारी दाखल केली. या कालावधीत विलास इंगोले, बबलू शेखावत, शेख जफर यांचा वरिष्ठांशी संवाद सुरू होता. तत्पूर्वी करारानुसार अविनाश मार्डीकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा, असे पत्र काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत यांच्या नावे मिळाले. त्यानंतरही वरिष्ठ नेत्यांकडे तवक्कल यांच्यासाठी मनधरणी करण्यात आली. प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशासमोर जायचे कसे? हा विचार करुन तवक्कल यांची उमेदवरी परत घेतली. मार्डीकरांची अविरोध निवड झाली. (प्रतिनिधी)१० सदस्य उपस्थित१६ सदस्यीय स्थायी समिती सभागृहातील १० सदस्य निवडणुकदरम्यान सभागृहात उपस्थित होते. यात निलिमा काळे, शेख हमीद शद्दा, मो. आसिफ (तवक्कल), मो. हारुण रहिमाबी अ रफिक, दिनेश बुब, अविनाश मार्डीकर, दीपक पाटील, सेनेच्या रेखा तायवाडे आणि जनविकास काँग्रेसचे राजू मसराम व अंजली पांडे यांचा समावेश होता. मार्डीकर २५ वे सभापतीराकाँ फ्रंटचे अविनाश मार्डीकर हे स्थायी समितीचे २५ वे सभापती ठरले आहेत. त्यांनी यापूर्वीही २००७-२००९ दरम्यान दोनदा महापालिकेची तिजोरी सांभाळली आहे. सभापतींच्या कक्षातून शेवटचे प्रयत्नमावळते सभापती विलास इंगोले यांच्या दालनातील अंतर्गत कक्षातून शेवटच्या मिनिटापर्यंत बबलू शेखावत, विलास इंगोले, शेख जफर यांचे प्रयत्न सुरू होते. ११.३० पर्यंत बबलू शेखावत अनेकांशी संपर्क करीत होते. तवक्कल कसे योग्य ते पटवून देत होते. शेवटी वरिष्ठांकडूनच मार्डीकरांच्या नावे आदेश निघाल्याने शेखावत गटास शांत व्हावे लागले. मार्डीकरांना शुभेच्छा! औपचारिक निवड झाल्यानंतर मार्डीकरांनी महापौर कार्यालय गाठून महापौर रिना नंदा यांचेकडून शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नगरसेवकांनीही शुभेच्छा दिल्या. शेवटी करारावरच शिक्कामोर्तबविलास इंगोलेनंतरची सहा महिन्यांची टर्म राकाँ फ्रंटची असताना रावसाहेब शेखावत यांनी वेगळे समीकरण मांडले. खोडके आता काँग्रेसमध्ये असल्याने स्थायी सभापती काँग्रेसचाच, अशी भूमिका त्यांनी घेतली. प्रदेशाध्यक्षांसह दिल्लीच्या नेत्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचविण्यात आला. मात्र संजय खोडके यांनी चार वर्षांपूर्वीच्या कराराची आठवण करुन देत प्रदेशाध्यक्षांना ही त्या कराराच्या वैधतेबाबत पटवून दिले. शेवटी खा. अशोक चव्हाण यांनी करारावर शिक्कामोर्तब केले. तवक्कलकडून अर्ज माघारीकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अविनाश मार्डीकर यांना समर्थन देण्याचे आदेश दिल्याने शेखावत गटाला बॅकफुटवर यावे लागले. ११.३० वाजताच्या सुमारास काहीच शक्यता नसल्याने बबलू शेखावतांकडून आसिफ तवक्कल यांना उमेदवारी अर्ज परत घेण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार तवक्कल यांनी अर्ज परत घेतला. मार्डीकरांची अविरोध निवड झाली.
खोडकेंचे वर्चस्व सिद्ध; मार्डीकर अविरोध
By admin | Published: March 11, 2016 12:14 AM