अमरावती : येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची काही समाजकंटकांनी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. यातील मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी शहरातील विविध संघटनांच्या वतीने सोमवारी करण्यात आली. सोमवारी सकाळी स्थानिक राजकमल चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो अमरावतीकरांसह विविध संघटनांनी एकत्र येत उमेश कोल्हे यांना मूक श्रद्धांजली वाहिली.
येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास सोमवारी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत ४ जुलै रोजी संपली, त्या चौघांसह न्यायालयीन कोठडीत असलेल्या एकासह एकूण पाच आरोपींना एनआयएने ताब्यात घेतले. याशिवाय, आरोप निष्पन्न झालेल्या दोघांसह सात आरोपींचा ताबा एनआयएकडे आला आहे.
२ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने ट्वीट करून कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे जाहीर केले होते. तत्पूर्वी १ जुलै रोजीच एनआयएच्या एका चमूने अमरावती गाठून समांतर तपास चालविला होता. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून शहर कोतवाली पोलिसांकडून संपूर्ण प्रकरण जाणून घेतले. तर, २ जुलै रोजी दुपारी शहर पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी पत्रकार परिषद घेत कोल्हे यांची हत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने करण्यात आल्याचा खुलासा केला.
या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, डॉ. युसुफ खान व मास्टरमाइंड शेख इरफान हे दोघे अद्यापही शहर कोतवाली पोलिसांच्या कोठडीत आहेत. दरम्यान, मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा वल्द शेख इब्राहिम, शाहरूख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान, अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तसलीम, शोएब खान ऊर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२, रा. यास्मिननगर) या चौघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शहर कोतवाली पोलिसांनी त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. तर, एनआयएने अर्ज दाखल करत त्या चौघांसह न्यायालयीन कोठडीत असलेल्या अतिब रशीदचा ताबा मिळावा, असा अर्ज सोमवारीच न्यायालयात सादर केला. त्यामुळे सातही आरोपींसह शहर कोतवाली पोलिसांत नोंदविलेला एफआयआर व केसशी संबंधित संपूर्ण दस्तऐवज एनआयएला सुपूर्द केला जाणार आहे. या प्रकरणात एनआयएने दिल्ली येथे सातही आरोपींविरुद्ध यूएपीए ‘अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट २०१९’नुसार स्वतंत्र एफआयआर नोंदविला आहे.
हे आहेत अटकेतील आरोपी
मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा वल्द शेख इब्राहिम (२२, रा. बिस्मिल्ला नगर, लालखडी), शाहरूख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५, रा. सुफिया नगर), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तसलीम (२४, रा. बिस्मिल्ला नगर), शोएब खान ऊर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२, रा. यास्मिननगर), अतिब रशीद वल्द आदिल रशीद (२२, मौलाना आझाद नगर) आणि युसूफ खान बहादूर खान (४४, बिलाल कॉलनी) व शेख इरफान शेख रहिम (३५, कमेला ग्राऊंड) या सात आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सर्व जण अमरावतीचे रहिवासी आहेत.
शमीम आठवा आरोपी
या प्रकरणातील सात आरोपींच्या चौकशीनंतर आठवा आरोपी म्हणून शमीम नामक आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधार्थ पथके रवाना झाली असून, त्याला अटक करून एनआएकडे सुपूर्द करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली.