मार्च महिन्यात आघात, वीरेंद्र जगताप यांच्यासमवेत जिल्हाधिकार्यांची भेट
नांदगाव खंडेश्वर : मार्च महिन्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल त्वरित आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासमवेत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
तालुक्यातील गटग्रामपंचायत खानापूर, मलकापूर, गोळेगाव, जगतपूर, सालोड, ढंगाळा, पळसमंडळ, धर्मापूर, ढवळसर, देऊळगव्हाण परिसरातील शिवारात १८ मार्च २०२० ला झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील गहू, हरभरा, भुईमूग तसेच संत्रा फळबागेचे अतोनात नुकसान झाले होते.
त्यानंतर तलाठी व कृषिसहायक यांनी नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयात सादर केल्याचे तलाठी व कृषिसहायकांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले. परंतु, अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. अखेर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासोबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून व्यथा मांडली. यावेळी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष मनोहर बगळे, योगेश गावंडे, प्रमोद इंझळकर, गणेश श्रुंगारे, गोरखनाथ श्रुंगारे, प्रवीण लढे, अनंत राणे, माधव इंझळकर, विष्णू नेवारे आदी शेतकरी मंडळी उपस्थित होती.