अमरावती : ग्रामीण भागात रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास खासगी वाहनात किंवा दुचाकीवर दवाखान्यात न्यावे लागतात. परंतु लॉकडाऊन कालावधीत अशा वाहनांना पेट्रोल देण्याची परवानी नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पेट्रोल- डिझेलसाठी पायपिट होत आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना यात सिथिलता देऊन पेट्रोल सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता प्रदीप चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ई-मेलव्दारे पत्र पाठवून केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ मे पर्यंत काढलेल्या आदेशानुसार पेट्रोलपंपावर पेट्रोल किंवा डिझेलची किरकोळ विक्री करताना मालवाहतूक, रुग्णवाहिका, सरकारी वाहने, सरकारी कर्मचारी, पासधारकांना पेट्रोल-डिझेल विक्रीची मुभा दिली आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना ऐनवेळी घरातील किंवा शेजारील रुग्णांना दवाखान्या नेण्याचे असेल तर त्यांच्याकडे पास किंवा इतर कुठलाही पुरावा नसल्याने पेट्रोल घेताना अडचण निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या कामाला जायचे असल्यास पेट्रोल किंवा डिझेल उपलब्ध न झाल्यास प्राणहानी, वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोलपंप संचालक व कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करुन त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करू नये, असे प्रदीप चौधरी यांनी पत्रात म्हटले आहे.