एसपींची कारवाई : रावसाहेब कडूंना मारहाण केल्याचा ठपका अमरावती : आ. बच्चू कडू यांचे मोठे बंधू छोटू ऊर्फ रावसाहेब कडू यांना अटक करून मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा पैरवी अधिकारी किशोर वैरागडे यांना निलंबित करण्यात आले. सोमवारी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी हे आदेश दिलेत. या निलंबनामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचे बंधू रावसाहेब बाबाराव कडू यांच्याविरूद्ध चांदूरबाजार न्यायालयाने स्टॅडिंग वॉरंट काढला होता. त्यानुसार जिल्हा पैरवी अधिकारी किशोर वैरागडे यांनी रावसाहेब कडू यांना अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी रावसाहेब कडूंना मारहाण केल्याची तक्रार आ.बच्चू कडू यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली होती. यासंदर्भात झालेल्या चौकशीत पोलीस उपनिरीक्षक किशोर वैरागडे यांनी रावसाहेब कडू यांना मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी वैरागडेंच्या निलंबनाचे आदेश दिलेत. मुंबई नागरीसेवा भाग-१ अनुसार निलंबनाचा आदेश अस्तित्वात असेपर्यंत वैरागडेना दरमहा निर्वाहभत्ता व त्यावरील इतर भत्ते मंजूर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पीएसआय किशोर वैरागडे निलंबित
By admin | Published: August 09, 2016 11:56 PM