चांदूर रेल्वे पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय अंतर्गत सहा पोलीस ठाणी येतात. तब्बल १३० सार्वजनिक गणेशमूर्तींची स्थापना यंदा करण्यात आली. चांदूर रेल्वे २४, दत्तापूर ३२, मंगरूळ दस्तगीर १०, कुऱ्हा २६ , तळेगाव दशासर ७, तिवसा ३१ अशा सार्वजनिक मंडळांनी गणपती स्थापना केली होती. शहरी भागात ५१, तर ग्रामीण भागात ७९ गणेशमूर्ती स्थापन झाल्या. ३१ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबविण्यात आली. चांदूर रेल्वे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात शांतता समिती तसेच गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक यापूर्वीच घेतली.
गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती न करता, ती घरीच आटोपून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. पावसामुळे नद्यांना नाल्यांना पूर आहे. यात पाणीसाठा अधिक असल्यामुळे गणेश विसर्जन करताना या पाण्यात उतरू नये, असे आवाहन यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी केले आहे.