वनविभागाचा सतर्कतेचा इशारा : सकाळ, सायंकाळी फिरण्यास बंदीअमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील पाच ते सहा बिबट्यांचा वावर असून अमरावती विद्यापीठ परिसरातील तलावावर बिबट्यासह शावकाच्या पायांचे ठसे वनविभागाला आढळून आले आहेत. वनविभागाने विद्यापीठ परिसरात मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक न करण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या आहेत. अनेक दिवसांपासून वडाळी वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांचा शहरालगतच्या परिसरात संचार वाढल्याचे सिध्द झाले आहे. वडाळी नर्सरी, पोहरा मार्ग, एसआरपीएफ कॅम्प आणि आता विद्यापीठ परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. शहरालगतच बिबट्याचा वावर असल्यामुळे मानव विरुध्द वन्यप्राणी असा संघर्ष निर्माण होऊ शकतो. जंगलापर्यंत मानवी वस्ती जाऊन पोहोचल्याने ही स्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमिवर आता वनविभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वनविभागातर्फे शिकारी प्रतिबंधक पथकाला प्रशिक्षणसुध्दा देण्यात आले आहे. शुक्रवारी विद्यापीठ परिसरामागच्या तलाव परिसरात काही नागरिकांना वाघ दिसल्याची चर्चा होती. मात्र, तो वाघ नसून बिबट असल्याची खात्री वनविभागाने केली आहे. बिबट्याचा वावर सुरु असल्यामुळे शिकारप्रतिबंधक पथकाने तलाव परिसरात गस्त वाढविली आहे. तलावाजवळ बिबट्यासह शावकाच्या पायांचे ठसे वनकर्मचाऱ्यांना आढळून आले आहेत. मात्र, बिबट नेमका कोणत्या दिशेने येतो, याचा शोध आता वनकर्मचारी घेत आहे. अद्याप वनविभागाकडून तलाव परिसरात टॅ्रप कॅमेरे लावण्यात आले नाहीत. मात्र, बिबट्याचा येणाचा मार्ग निश्चित होताच ट्रॅप कॅमेरे लाऊन त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. (प्रतिनिधी)
बिबट्यासह शावकांचेही पगमार्क आढळले
By admin | Published: November 23, 2015 12:17 AM