अमरावती : रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांच्या सुविधांसाठी पुणे-भुसावळ एक्स्प्रेस ही गाडी अमरावतीरेल्वे स्थानकापर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवार, १३ नोव्हेंबर रोजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती स्टेशन येथून हिरवा झेंडा दाखविला गाङीला पुणेकडे रवाना केले.
प्रवाशी सुविधासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक ११०२५ आणि ११०२६ पुणे - भुसावळ एक्स्प्रेस ही १३ नोव्हेंबरपासून दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे अमरावतीपर्यंत सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. खासदार राणांच्या हस्ते झेंडा दाखवून रेल्वे रवाना करतावेळी प्रवाशी संघटना सदस्य, रेल्वे अधिकारी, स्टेशन कर्मचारी उपस्थित होते.
गाडी क्रमांक ११०२५/ ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेसचा विस्तार १३ नोव्हेंबरपासून अमरावतीपर्यंत दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे वळवून रवाना हाेणार आहे.
गाडी क्र. ११०२६ पुणे – अमरावती एक्स्प्रेस ही १३ नोव्हेंबरपासून पुणे येथून ११.०५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्र. ११०२५ अमरावती – पुणे एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरपासून अमरावती येथून रात्री १० वाजून ५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचेल.
या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे. या गाडीला एकूण १७ डब्बे असून एक वातानुकूलित चेअर कार, एक शयनयान, १३ साधारण (नॉन एसी) चेअर कार ज्यापैकी ७ आरक्षित आणि ६ अनारक्षित, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार डबे आहेत.पुण्याकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पुणे-भुसावळपर्यंत चालणारी ही एक्सप्रेस अमरावतीपर्यंत सुरू करावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. याचे फलित म्हणजे १३ नोव्हेंबरपासून दररोज पुण्यासाठी गाडी सुरू झाली आहे.- नवनीत राणा, खासदार