अमरावती : वीज थकबाकीची वसुली करताना कुचराई करणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश महावितरणच्या प्रादेशिक संचालकांनी गुरुवारी दिले. महावितरणची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
कंपनीने ग्राहकांना १० महिने अखंडित वीज दिली. वसुलीसाठी ना तगादा लावला, ना वीजपुरवठा खंडित केला. वस्तुस्थिती ग्राहकांना समजावून सांगा आणि अधिक कार्यक्षम बनवून १०० टक्के वसुली करा विज थकबाकीची वसुली करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. प्रादेशिक संचालकांनी नुकतीच अमरावती परिमंडळाचा सविस्तर आढावा बैठक घेतला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सर्व वर्गवारीतील थकबाकी १०० टक्के वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १०० टक्के वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता दौरे काढावे, मेळावे आयोजित करावे ग्राहकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित करावे, महाकृषी ऊर्जा धोरणाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचवावी तसेच या धोरणांतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यावी व भरघोस सवलतीची माहिती देऊन त्यांना थकबाकी मुक्त होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे यासह वीज वितरण हानी कमी करण्यासाठी व्यापक उपाययोजना कराव्यात असे निर्देशही संचालकांनी दिले आहेत. मागील दहा महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड असल्याने अशा स्थितीत वीज बिल माफ होणार नाही. तसेच अशी स्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो या गंभीर परिस्थितीची जाणीव ग्राहकांना करून द्यावी १०० टक्के वीज बिल वसुली करा तसेच शासकीय कार्यालयातील थकबाकीची वसुली करा असे निर्देश प्रादेशिक संचालकांनी दिल्याचे सुत्रांनी सांगितले. बैठकीला अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.