अमरावती : काही दिवसांपासून वातावरणातील बदल व त्यासाठी नागरिकांनी केलेल्या उपाययोजनांची संधी साधून डेंग्यूच्या साथीने डोकेवर काढले आहे. ज्या नागरिकांच्या घरी लार्व्हा डेंग्यूचा डास आढळून येईल, त्या घरमालकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
सध्या पावसाळा सुरू असला तरी उकाड्यामुळे नागरिकांनी बंद केलेले कूलर पुन्हा बाहेर काढले आहे. त्यामुळे टपात साचलेल्या पाण्यात लारव्हा तयार होऊन डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन त्याची पैदास वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनी आरोग्य विभागाकडून लेखाजोखा जाणून घेतला. यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय ज्या तीन तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळले तेथे आरोग्य यंत्रणा अलर्ट ठेवण्याचे निर्देश सीईओंनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भात सूचनाही दिल्या आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागातील तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर, चिखलदरा तालुक्यातील आमझरी अचलपूर तालुक्यातील चमक या तीन गावात डेंग्यूचे २५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. याशिवाय धारणी, भातकुली व इतर भागात तीनशेवर रुग्ण आढळले आहेत. या सर्व एलायझा रुग्णांची चाचणी केल्यानंतर आरोग्य यंत्रणेने त्यांना डेंग्यू झाल्याचे घोषित केले. त्यामुळे ग्रामीण भागात हा आजार आणखी वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत.
बॉक्स
या ठिकाणी आढळतो डेंग्यूचा डास
डेंग्यूचा डास हा स्वच्छ पाण्यात निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा, सायकल, वाहनांच्या टायरमध्ये पाणी जमा होऊ देऊ नये, कूलरचे पाणी नियमित बदलावे किंवा कूलर शक्यतो बंद ठेवावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
बॉक्स
बीडीओंना सूचना
साथीचे आजार जुलै, ऑगस्ट महिन्यात बहुधा होतात. त्यामुळे प्रत्येक गावात स्वच्छता पाळण्यासाठी पंचायत समितीमार्फत ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत. अशातच आता डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने सर्व गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना लेखी सूचना देऊन कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लारव्हा सापडल्या दंडात्मक कारवाईच्या सूचना सीईओंच्या मार्गदर्शनात जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी दिले आहे.